धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचाकडून शहादाकडे जाणाऱ्या मार्गावरील तापी नदीच्या पुलावरील रस्त्याला भगदाड पडल्याची घटना आज (दि. १७) निदर्शनास आली. त्यामुळे या मार्गावरील सर्वच रहदारी तातडीने थांबवण्यात आली असून नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन धुळ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे. दरम्यान या पुलाच्या दुरावस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा ते शहादा दरम्यानचा हा मार्ग धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर तापी नदीवर पूल असून या पुलावर मोठ्या प्रमाणावरून वाहतूक सुरू असते. आज सायंकाळी या पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याची बाब काही वाहनचालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी ही बाब तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवली. त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलाने हा मार्ग तातडीने रहदारीसाठी बंद केला आहे. ही माहिती नंदुरबार पोलीस दलाला देखील देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या बाजूचा शहादा मार्गे येणारा रस्ता देखील अडवण्यात आला आहे. दरम्यान पुलाला पडलेले भगदाड दिवसाच्या उजेडात निदर्शनास आले. त्यामुळे मोठी अप्रिय घटना टळल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान धुळे जिल्ह्याकडून जाणारी रहदारी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दोंडाईचा चौफुली वरून रहदारी नंदुरबार मार्गे शहादा कडे वळवण्यात आली असून शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदीवरील पुलाचा देखील रहदारीसाठी वापर करणे शक्य असल्याने या मार्गाचा वापर वाहन चालकांनी सुरू केला आहे .
दरम्यान धुळे जिल्हा पोलीस दलाने दोंडाईचा शहरापासूनच या अपघातग्रस्त पुलाकडे जाणारी रहदारी थांबवली आहे. नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी देखील अपघात अपघात ग्रस्त पुलाचा रहदारीसाठी वापर करून नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे.
दरम्यान तापी नदीवरील या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाकडे संबंधित विभागाने अपेक्षित लक्ष दिले नाही, असा आरोप आता होतो आहे तसेच सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटना झाल्यासारखा प्रकार टाळण्यात धुळे जिल्ह्यात यश आले असले तरी पुलाच्या दुरुस्तीचा विषय मात्र ऐरणीवर आला आहे.