

धुळे : भाडयाने वाहनांची परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्या टोळीतील सहा जणांना गजाआड करण्यात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाला यश आले आहे. या आरोपीच्या ताब्यातून दोन कार देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या भामट्यांनी अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घालण्याचा संशय असून त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
अनेक शहरांमध्ये चालकाविना आलीशान कार भाडयाने पुरविणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्यांकडुन भाडयाने वाहने घेवुन ती वाहने परस्पर स्वस्तात विक्री करायचे असल्याचे दाखवुन वाहन खरेदीदार यांना आकर्षित करुन त्यांची आर्थिक फसवणुक करणारी टोळी कार्यरत असल्याची तक्रार तालुका पोलिसांकडे झाली होती.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे राहणारे अभिषेक शिवाजी पाटील यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. पाटील यांना सेंकंडहॅन्ड वाहन खरेदी करायचे असल्याने त्यांचा चांगल्या वाहनाकरीता शोध सुरु असताना त्यांनी सोशल मिडीयावरुन महिंद्रा कंपनीची थार ही कार क्रमांक टिएस 07 केबी 7004 हे वाहन विक्रीस असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी अरबाज नसीम शेख, मो. अझरुरुददीन अब्दुल रज्जाक, सैय्यद अबरार, अकबर अहमद यांच्याशी संपर्क केला. या आरोपींनी तक्रारदार पाटील यांना शिरुड चौफुली येथे बोलावुन वाहन दाखविले. हे वाहन आकर्षक किंमतीत विक्री करण्याचे आमिष दाखवुन ३ लाख रुपयांना आगाऊ रकमेची मागणी करुन हे वाहन तक्रारदार यांना सुपूर्द केले. उर्वरीत रक्कम ३ लाख रुपये वाहन नावावर केल्यानंतर दयायचे असल्याचे ठरवले. अशा प्रकारे आरोपी यांनी तक्रारदार यांना वाहन ताब्यात देवुन ३ लाख रुपये रक्कम घेवुन निघुन गेले. त्यानंतर उर्वरीत रक्कम अदा करुन वाहन नावावर करुन देण्याकरीता तक्रारदार यांनी आरोपींशी संपर्क साधला असता त्यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर १० दिवसांनी काही जणांनी फिर्यादी पाटील यांना संपर्क साधला.
यानंतर मो. मझर अहमद इप्तेकार अहमद सिध्दीकी, मोहम्मद अब्दुल्लाबीन सैफ , सैय्यद शहा फवाद शहा ( सर्व रा. चंद्रयान गुटटा, हाफी बाबा नगर, हैद्राबाद) अशांनी फिर्यादी यांना भेटुन फिर्यादी त्यांच्या ताब्यात असलेल्या कारचे मालक ते असल्याचे सांगुन त्यांच्याकडे असलेल्या वाहनाचे ते मुळ मालक असुन या वाहनाला जिपीएस लावले असल्याने ते कार शोधत त्यांच्यापर्यत आले आहेत. हे वाहन चोरी झाल्याची तक्रार झाली असल्याने कार फिर्यादी यांच्या ताब्यातुन घेवुन निघुन गेल्याने फिर्यादी यांची फसवणुक झाल्याची खात्री झाली होती.
दोन दिवसांपूर्वी यातील फिर्यादी पाटील यांनी पुन्हा नाव बदलुन पुन्हा या आरोपींशी संपर्क साधुन कार खरेदी करायची असल्याचे सांगितल्याने त्यांनी फिर्यादीस मारुती सुझुकी कार क्रमांक एक्सएल ६ टिजी ०७- सी १९८९ हीचे फोटो व्हाटअपवर दाखविल्याने फिर्यादी यांनी ही कार खरेदी करायची असल्याचे सांगितले. आरोपींनी त्यांना पुन्हा शिरुड चौफुली येथे बोलावल्याने फिर्यादी हे तेथे गेले. यावेळी पाटील यांनी फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना ओळखल्याने त्यांनी आरडाओरड केली. लोकांच्या मदतीने एकण ६ जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, अशा पद्धतीने वाहनांची चोरी करून फसवणूक करणारी टोळी शिरूड चौफुली परिसरात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांना असल्यामुळे त्यांनी या भागामध्ये पोलिसांचे गस्ती पथक तैनात करून ठेवले होते. त्यामुळे घटनास्थळावरून नागरिकांनी संपर्क करताच पथकाने तातडीने हालचाली करीत सहा भामट्यांना ताब्यात घेतले. या आरोपींची प्राथमिक चौकशी करून त्यांच्याकडून दोन कार देखील जप्त केल्या.