

धुळे : राज्यभरातील डाक कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने आज संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली. धुळे येथील मुख्य डाक कार्यालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने कार्यालय रिकामे करून बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे (BDDS) तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
डाक विभागाच्या विभागीय कार्यालयाला एका निनावी ईमेलद्वारे महाराष्ट्रभरातील कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. हा ईमेल धुळे कार्यालयाला प्राप्त होताच, याची माहिती तातडीने पोलीस प्रशासनाला देण्यात आली.
धमकीचे गांभीर्य ओळखून धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुढील पावले उचलण्यात आली. कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. डाक कार्यालयाचा परिसर सील करून सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला. बॉम्ब शोध पथकातील जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने कार्यालयाचा कानाकोपरा शोधला.
दुपारपर्यंत चाललेल्या या शोधमोहिमेत अद्याप कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नाही. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विनंती केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलीस या ईमेलचा उगम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.