

अंबादास बेनुस्कर, पिंपळनेर (जि. धुळे)
साक्री तालुक्यासह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील चौपाळे, रोहोड, हनुमंतपाडा, चिंचगावठाण आणि पंचक्रोशीतील गाव-पाड्यांमध्ये मार्गशीर्ष चंद्रदर्शनानंतर सुरू झालेल्या निसर्गदेव डोंगऱ्यादेव पूजन -उत्सवाची यंदा भक्तिभावात सांगता झाली. दीड आठवडाभर परिसरात पारंपरिक बासरीचा नाद घुमत राहिला. डोंगर-दऱ्यांतून माऊलींचे आगमन होताच प्रत्येक गावात भक्तीमय वातावरण अधिक रंगत गेले.
26 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या धार्मिक विधींनंतर पंधरा दिवस उपवास आणि नित्यनियम पाळणाऱ्या आदिवासी भगिनींनी डोंगऱ्यादेव गडावर पूजा करून माऊलीची प्राणप्रतिष्ठा गावात आणली. परतीनंतर महिलांनी आरती करून माऊलीचे स्वागत केले. त्यानंतर धानपूजन, नवस, स्थापना, शालू बांधणे, प्रसार आणि भंडारा अशा परंपरागत विधींनी संपूर्ण परिसर उत्सवमय झाल्याचे पहावयास मिळाले. आदीवासींचा एकोपा, शिस्त आणि पारंपरिक श्रद्धा जपत आदिवासी समाजाने हा सामूहिक उत्सव एकत्रितपणे साजरा केला.
देव चेतना: स्थानिकांचा आहे दृष्टिकोन
उत्सवादरम्यान काहींना ‘अंगात वारे येणे’ असे दिसून येते. अनेकजण याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतात, मात्र आदीवासी नागरीकांच्या मते ही अंधश्रद्धा नसून ती एक अनोखी चेतनेची जागृत अवस्था असते. मनापासून ध्यान, चिंतन आणि भक्तीभावाने पूजा केल्यावर शरीरातील ज्ञानेन्द्रिये सक्रिय होतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या लहरीमुळे अंग थरथरते, काटे येतात आणि भावनिक प्रतिसाद उमटतो. या अवस्थेला ‘देव चेतना’ असे म्हटले जाते. पंचमहाभूतांनी बनलेल्या मानव शरीरातील शक्ती जागृत होण्याचा हा क्षण मानला जातो.
संस्कृतीचे जतन
डिजिटल युगातही आदिवासी तरुण, शिक्षित आणि नोकरदार वर्ग परंपरेचे काटेकोर पालन करतात, हे विशेष मानावे लागते. उत्सवाच्या काळात कोणताही अपवित्र व्यवहार होऊ नये याची काळजी घेतली जाते. निसर्ग आणि मानवाला देवरूपात पाहण्याची आदिवासींची संस्कृती आजही येथे जिवंत आहे.
‘डोंगऱ्यादेव’चे सांस्कृतिक महत्त्व
कोकणी मावची, भिल्ल, पावरा, कुकना, बारली यांसारख्या जमाती हा उत्सव साजरा करतात. उत्सव पूर्णपणे सामुदायिक असल्याने गावोगाव एकोपा आणि ऐक्य वाढते. अनेक सरकारी प्रकरणांमध्येही आदिवासी डोंगऱ्यादेवाची शपथ घेतात, यावरून या देवतेचे मानस्थान स्पष्ट होते. उत्सवादरम्यान गावात घुमणारे डोंगऱ्यादेव वळीत गीत ही आदिवासी संस्कृतीची खास ओळख आहे.
तपश्चर्या आणि परंपरेची निष्ठा
सातपुडा आणि सह्याद्रीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन कठीण असले तरी संस्कार आणि सामुदायिक परंपरा जपण्याची त्यांची निष्ठा आजही कमी झालेली नाही. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या डोंगऱ्यादेव गडदर्शनानंतर पंधरा दिवस चाललेला डोंगऱ्यादेव उत्सव गावोगावी भक्तिभावाने पार पडला. परंपरा, श्रद्धा, एकोपा आणि निसर्गपूजेचा सुंदर संगम असलेला हा उत्सव आदिवासी संस्कृतीचे जिवंत प्रतीक मानले जात आहे.