

पिंपळनेर, जि. धुळे : साक्री तालुक्यातील भामेर येथे दोन दिवसीय दि. १६ व १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम मार्शल आर्ट स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती प्राचार्या सोनाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रत्येक शाळेतून चार उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रा. ना. पाटील, चेअरमन संभाजी अहिरराव, जगदीश ओझरकर, प्राचार्या सोनाली पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये वनस्पतींचे भाग, पवनचक्की, गणितीय प्रकल्प, होलोग्राम, पर्यावरण व जलसंवर्धन, चंद्रयान-३, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, जलविद्युत धरण, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, सोलर इरिगेशन, ऊर्जा संवर्धन, लाय-फाय तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश होता.
प्राचार्या सोनाली पाटील म्हणाल्या की, विज्ञान ही निरीक्षण, प्रयोग व विश्लेषणाच्या माध्यमातून सत्य शोधण्याची शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. विज्ञानामुळे दैनंदिन जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि प्रगत झाले आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांकाची चिंता न करता विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.