

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर बस स्थानक आवारात लावलेली राज्य परिवहन महामंडळाचे महिंद्रा सुमो वाहन चोरट्याने लांबविल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मंगळवार (दि.9) रोजी धुळे आगारातील मार्ग तपासणी पथकाचे महिंद्रा सुमो गोल्ड (एमएच 06 बीएम 1325) हे वाहन दोंडाईचा–साक्री–दहिवेल–सामोडे मार्ग तपासणी पूर्ण करून रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळनेर बसस्थानकात पोहोचले. वाहन व्यवस्थित लॉक करून चालक आणि कर्मचारी विश्रांतीगृहात झोपले होते.
मंगळवार (दि.9) पहाटे साडेतीनच्या सुमारास चालक जगदीश चौधरी वाहन पाहण्यासाठी गेले असता शासकीय वाहन जागेवर आढळले नाही. सहकाऱ्यांसह परिसरात शोध घेतल्यानंतरही वाहन मिळाले नाही. वाहनात मद्यप्राशन तपासणी यंत्र, खाते वाहन डायरी आणि G-12 पावती पुस्तिका अशी साहित्ये होती. चौधरी यांच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे आणि उपनिरीक्षक विजय चौरे यांच्या पथकाने आमळी परिसरात वाहनाचा मागोवा घेत आरोपी किरण जगन गायकवाड (वय 20) याला ताब्यात घेतले. वाहन तसेच इतर साहित्य मिळून 10 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.