

धुळे : “मी धुळे शहराचा आमदार नाही, तर तुमचा सालदार म्हणून काम करत आहे,” असे भावनिक वक्तव्य करत आमदार अनुप अग्रवाल यांनी गोरगरीब नागरिकांसाठी झटण्याची भूमिका अधोरेखित केली. एबी फाउंडेशन व भाजप कामगार आघाडीच्या वतीने कामगार बांधव व महिलांना गृहोपयोगी भांडी आणि कामगार कीटचे वाटप सुरू करण्यात आले असून, याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कामगार लाभार्थी मेळाव्यात कामगार किटचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, जिल्हा सरचिटणीस भारती माळी, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, ओमप्रकाश खंडेलवाल, जितेंद्र चौवटिया, यशवंत येवलेकर, भिकन वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एबी फाउंडेशनच्या माध्यमातून रोज २०० लाभार्थ्यांना सुमारे ३० हजार रुपये किमतीची भांडी मोफत दिली जात आहेत. आतापर्यंत ४,००० हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून, संपर्क कार्यालयातून दररोज कीट वाटप सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकार विविध जनकल्याणकारी योजना राबवत असून, त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.
कोणत्याही आरोग्य समस्या असणाऱ्या नागरिकांनी राजवाडे बँकेसमोरील जुने किंवा मालेगाव रोडवरील नवीन संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. “कोणताही गरजू रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुमच्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा पुन्हा धुळे महापालिकेवर फडकवूया. तुमचे प्रेम आणि पाठबळ माझ्या कामातून वाया जाऊ देणार नाही. तुमच्या आणि शहराच्या विकासासाठी मी नेहमीच झटत राहीन.
अनुप अग्रवाल, आमदार, धुळे