

Nijampur minor girl assault case
सोनगीर : निजामपूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, १५ वर्षे ४ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला १० फेब्रुवारी रोजी घरात कोणी नसताना एकटेपणाचा फायदा उचलून एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावली आणि तिला पळवून नेल्याची माहिती समोर आली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने मुलीचा शोध घेतला. पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४, ६५ (१) आणि ८७ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अंतर्गत कलम ४ आणि ६ अशी वाढीव कलमे लावण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहेत.