धुळे : धुळे तालुक्यातील निमडाळे येथे वनभोजनासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा दगडाच्या खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाळेच्या वतीने शिक्षण विभागाला याची माहिती देण्यात आली असून आता शिक्षण विभाग यावर चौकशी करीत आहे. या संदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निमडाळे येथे असलेल्या जयहिंद हायस्कूलच्यावतीने गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच दोघे विद्यार्थी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीकडे गेले. यावेळी या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांची नावे हितेश वसंत सूर्यवंशी व मयूर वसंत खोंडे अशी असून हे दोन्ही विद्यार्थी इयत्ता आठवी मधील आहेत. हे विद्यार्थी खाणीकडे नेमके कसे गेले आणि बुडाले. या संदर्भात सविस्तर तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान शाळेच्या वतीने शिक्षण विभागाला देखील ही माहिती देण्यात आली असून शिक्षण विभागाने देखील या घटनेची चौकशी सुरू केली आहे.