पिंपळनेर, जि. धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल येथे राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवर उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूचा सर्विस रोड अरुंद असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्याच्या प्रयत्नात गुजरातकडुन येणारा ट्रक सर्विस रोडलगत असणाऱ्या गटारीच्या चारीत जाऊन उलटला. यात चालक, सहचालक किरकोळ जखमी झाल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या सर्विस रोडचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील येथील चौफुलीवर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. पण या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजुला एकच ट्रक निघेल, असा अरुंद सर्विसरोड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात राज्यातून साबणाचे खोके आणि तेलाचे पाऊच भरून येणारा ट्रक समोरून येणाऱ्या ट्रकला रस्ता देण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारीच्या चारीत ट्रकचे पुढील टायर आणि मागील टायर जाऊन ट्रक उलटला. सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही.चालक सहचालक किरकोळ दुखापती झाले आहेत.
ही पहिलीच घटना नसून अरुंद सर्विस रस्त्यामुळे अनेक अपघात येथे झाले आहेत.अनेकांना जीव गमवावा लागला आहे.काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे सर्विस रोड रुंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याआधी ह्याच उड्डाण पुलाच्या बोगद्यातून निघतांना वेगवेगळ्या अपघातात तीन तरुणांना जीव गमवावा लागला आहे.सर्विस रोड रुंद करून अपघातांची मालिका बंद करावी,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे कायम मोठं मोठी अवजड वाहने व मोठमोठी मिशनरी घेऊन जाणारे ट्राला वाहतूक करतात पणं अशा अवजड वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी अडचण येते. दरम्यान दोन्ही बाजूच्या वाहतूक थांबवुन ठेवावी लागते. कधी कधी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. अवजड वाहनाच्या चालकाला देखिल आपले वाहन मार्गस्थ करतांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सर्विस रोडचे रूंदीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.