

धुळे : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "जागतिक उच्चरक्तदाब दिवस" साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उच्चरक्तदाबाविषयी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले.
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) सादर केलेल्या पथनाट्यामार्फत उच्चरक्तदाबाच्या लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे मांडण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमास रुग्ण व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भंडागे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव, असि. शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल पाटील, मेट्रन शिंदे, मोरे, ओपीडी प्रभारी घोडके, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य गिते, एनसीडी जिल्हा समन्वयक डॉ. साहेर देशमुख, कार्यक्रम सहाय्यक प्रदीप ठाकूर, स्टाफ नर्स ज्ञानेश्वरी बोरकर व दीपाली परदेशी आदींसह अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण उपस्थित होते.
या उपक्रमामुळे उच्चरक्तदाबासंबंधी जागरूकता वाढून, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सजगता निर्माण होईल, असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगांवकर यांनी व्यक्त केले.