Dhule Crime : बकरी ईदनिमित्त धुळे पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा

Dhule Crime : बकरी ईदनिमित्त धुळे पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा
Published on
Updated on

धुळे : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रात्री विशेष मोहीम राबवत ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदीद्वारे असामाजिक घटकांवर जोरदार कारवाई करण्यात आली. यापुढेही कायदेभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

विशेष मोहिमेची व्याप्ती

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक शाखेला सक्त सूचना दिल्या होत्या. या मोहिमेत २५ पोलीस अधिकारी, ८० अंमलदार आणि ३४ होमगार्डसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून ही कारवाई केली. जिल्ह्यात एकूण २४ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स लावण्यात आले होते.

मोहिमेतील मुख्य कारवाई

वाहतूक नियमन : ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकूण ५ प्रकरणांत ३० हजार रुपयांचा दंड, तर मोटार वाहन कायद्यांतर्गत २४२ केसेस करून १ लाख ५७ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहर वाहतूक शाखेने स्वतंत्रपणे १७८ केसेस करून ९५ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला.

अवैध धंदे : गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री प्रकरणांत ५ गुन्हे दाखल करून १४ हजार ८०० रुपये किमतीची १७५ लिटर दारू आणि संबंधित साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ३ आरोपींकडून २,४०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

गोवंश तस्करी : प्राणी संरक्षण कायद्यान्वये ३ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४ लाख ९ हजार रुपये किमतीची १५ गोवंश जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत.

तपासणी : हिस्टरीशीटर व रेकॉर्डवरील २५ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त २१ मोकळी मैदाने, ७३ बार/हॉटेल्स, ३ ओयो हॉटेल्स आणि ८ नदीकाठच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली. एकूण ९३७ दुचाकी व चारचाकी वाहनांची झाडाझडती घेण्यात आली.

‘कायद्याचे राज्य राहील’ : पोलीस अधीक्षक

या मोहिमेबाबत बोलताना पोलीस अधीक्षक विशाल आनंद म्हणाले की, ‘धुळे जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. मोकळी मैदाने, शाळा परिसरात दारू पिणारे, हॉटेल्समध्ये टवाळकी करणारे आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही धडक कारवाया सुरूच राहतील. गुंडगिरी व असामाजिक प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news