

धुळे : आम्हाला आग्रा ते राजगड या शिवज्योत यात्रेचे स्वागत करण्याचे भाग्य मिळत असल्याने आम्ही भाग्यशाली आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदित्यमान इतिहास आहे. त्यांचा वसा आणि वारसा आपण चालविला पाहिजे, असा विचार आमदार राम भदाणे यांनी मांडले.
नगाव (ता.धुळे) येथे गरूडझेप मोहिम संस्थेची आग्रा ते राजगड हे एक हजार तीनशे दहा किमी पायी मोहीम शिवज्योत यात्रेचे आज रविवारी (दि.24) रोजी आगमन झाले. यावेळी आमदार राम भदाणे यांनी शिवज्योत यात्रेविषयी विचार मांडले. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, मारुती गोळे, राकेश विदाते, गरुड झेपचे समन्वयक भुपेंद्र पाटील, संपर्क प्रमुक रेखा कदम, धुळे शहरातील व्यापारी, ग्रामस्थ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, रोटरी क्लब, वंदे मातरम गृपचे सदस्य आदी उपस्थित होते. आमदार भदाणे म्हणाले की, शिवज्योत यात्रेतील लाठीकाठीचे प्रात्यक्षिक होत आहे. त्यामुळे आबालवृध्दांना प्रेरणा मिळत आहे. दैदिप्य इतिहास लोकांसमोर उभा राहत आहे.
रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट ही आहे. आग्राहून क्रूर-अत्याचारी औरंगजेबाच्या तब्बल ९९ दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप ही या ऐतिहासिक घटनेची नोंद जगभरातील तत्कालीन राज्यकत्यांनी घेतली होती. इतिहासाला कलाटणी देणारी, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेली घटना आहे. १७ ऑगस्ट १६६६ हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. याच दिवशी महाराज संकटात किंचितही डगमगले नाहीत. रक्ताचा एक थेंबही न सांडता ते काही दिवसांनी आई जिजाऊंच्या चरणी सुखरूपरित्या राजगडावर पोहोचले. राजांच्या या पराक्रमाला अभिवादन, या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी ही मोहीम सलग पाच वर्षांपासून सुरु आहे. हातात धगधगती शिवज्योत घेऊन शेकडो मावळे आग्रा ते राजगड तेराशे किमीचे अंतर अकरा दिवसांत धावत पुर्ण करीत आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या मोहिमेत दोन हजार मावळे सहभागी झाले आहेत. ५३ सायकल स्वार मुक्कामांच्या ठिकाणी लाठीकाठीसारखे मर्दानी खेळ करीत आहेत. प्रसिद्ध शिवव्याख्यात्यांही सोबत आहेत.
या यात्रेत आग्रा ते राजगड या मार्गावर हरितपट्टा तयार करण्यासाठी वृक्षांच्या दीड लाख बिया धावण्याच्या वाटेवर टाकत मावळे जात आहेत.