

धुळे : दोंडाईचा-वरवाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी नयनकुवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या विजयाचा क्षण साजरा करताना उपस्थितांनी परस्परांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
राज्यात नगराध्यक्ष पदासाठी झालेली ही पहिलीच बिनविरोध निवड ठरली आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्यमंत्री माधुरीताई मिसळ, माजी मंत्री आ. सुरेश खाडे, माजी मंत्री आ. संजय कुटे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संभाजीराव निलंगेकर, आ. प्रशांत ठाकूर, आ. निरंजन डावखरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रावल यांचा स्वतंत्रपणे सत्कार केला. यावेळी मंत्री जयकुमार रावल देखील उपस्थित होते.