

धुळे : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी लताबाई सोनार तर महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने उज्वला ठाकरे आणि उपसभापती पदासाठी शोभा भील यांच्या नावावर भारतीय जनता पार्टीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या तीनही पदासाठी अन्य कुणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे स्पष्ट झाले आहे. मात्र या संदर्भात होणाऱ्या विशेष सभेत त्यावर शिक्कामोर्तब होईल.
धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती सह सर्वच विषय समित्यांवर त्यांचा वरचष्मा राहील, ही बाब स्पष्ट आहे. मात्र या पदांवर कुणाला संधी मिळेल, याबाबत शहरात चर्चेला उधाण आले होते. विशेष म्हणजे स्थायी समिती सभापती पदासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग करणे सुरू होते. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावळ तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे इच्छुकांनी आपला पाठपुरावा सुरू केला होता. अखेर भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थायी समिती पदाच्या सभापतीपदासाठी लताबाई सोनार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर महिला आणि बालकल्याण समितीसाठी उज्वला ठाकरे आणि शोभा भील यांना संधी देण्याचे निश्चित झाले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ही अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर महानगरपालिकेत या तिघा उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला.
स्थायी समिती सभापतीपदासाठी सौ. लताबाई सोनार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जासाठी वंदना भामरे या सुचक तर विक्रम थोरात हे अनुमोदक आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी उज्वला ठाकरे यांनी दाखल केलेल्या अर्जासाठी वैभवी दुसाने सुचक तर प्रियंका बोरसे अनुमोदक आहेत. उपसभापती पदासाठी शोभा भील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या नावाला संध्या कदम यांनी अनुमोदन दिले आहे. वैभवी दुसाने या सुचक आहेत.
यावेळी त्यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी या उमेदवारांसोबत माजी आ. राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर सौ. मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ. ज्योत्स्ना पाटील, भाजपा बेटी बचाव बेटी पढावच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. अल्पा अग्रवाल, महादेव परदेशी, प्रतिभा चौधरी, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिररराव, माजी स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे, संजय जाधव, किरण कुलेवार, राकेश कुलेवार, विक्की परदेशी, डॉ. योगेश ठाकरे, नगरसेवक निलेश नेमाणे, आदींची उपस्थिती होती.