

धुळे : गावठाण, गायरान आणि वन विभागाच्या जागेवरची निवासासाठीची अतिक्रमणे संबंधित भूमिहीन व्यक्तींच्या नावे करण्याच्या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने बिऱ्हाड उपोषण (Birhad strike) केले जाणार असल्याची माहिती या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली आहे.
धुळे येथील आपला महाराष्ट्र लगतच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, ॲड. संतोष जाधव यांनी या आंदोलनाची माहिती दिली. गायरान गावठाण आणि वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण संदर्भात शासनाने 1991 पूर्वीच्या अटीच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. या जागांवर इंग्रज काळापासून आदिवासी राहतात. पण त्यांच्याकडे शिक्षणाच्या अभावामुळे अशा प्रकारचे पुरावे नाहीत. त्यामुळे शासनाने 1991 ऐवजी ही अट बदलावी, अशी मागणी यावेळी जाधव यांनी केली. (Birhad strike)
वनजमीन अतिक्रमित जागेवर उत्पन्न नसेल त्यांना शासन निर्णय 2005 आणि 2007 पूर्वीचे पुरावे असतील तर नाव लागते. मात्र यासाठी वन समितीच्या वतीने देण्यात येणारा अहवाल हा महत्त्वाचा असतो. बऱ्याच ठिकाणी वन समित्या गावात राजकारण करतात. काही गावात तर अशी समितीच कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आदिवासी भूमीहीनांना वन समितीचा हा दाखला वजा अहवाल मिळत नाही. परिणामी त्यांना हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागते. यात गावातील राजकारणामुळे देखील अडचण येत आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असणारे राजकीय आणि धन दांडग्यांनी 40 ते 50 एकर जमीन ताब्यात घेतल्याचे अनेक उदाहरणे दिसून आली आहेत. विशेषता शासनाचे प्रतिनिधी असणाऱ्या पोलीस पाटलांनी देखील वन जमिनीवर अतिक्रमण केल्याचे उदाहरणे आहेत. मात्र गरजू आदिवासींना त्यांचा हक्क दिला जात नाही.
गायरान जमिनी संदर्भात गाव पातळीवरून मोठ्या प्रमाणावर राजकारण होते. देवस्थान ट्रस्ट तयार केल्यास त्यांना जमीन देता येते. या अटीचा फायदा घेऊन गायरान जमीन देवस्थान ट्रस्टला दिली जाते .पण गरजू माणसाला पोट भरण्यासाठी जमीन मिळत नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात आपण अनेक वेळेस शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील पत्रव्यवहार केला असून आता सोमवार (दि.५ ऑगस्ट) रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून लोणी येथील जनसेवा फाउंडेशनच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ बिऱ्हाड उपोषण (Birhad strike) केले जाणार आहे. या उपोषणामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष संजय बर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हे आंदोलन राज्यस्तरीय असून धुळे जिल्ह्यातून पाच ते सहा हजार जण यात सहभागी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.