

धुळे : धुळे शहरातील मोगलाई परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकाचा उसनवारीच्या पैशावरून खून करून त्याला तापी नदीत फेकून दिल्याची बाब तपासात स्पष्ट झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली आहे .तर आणखी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरातील मोगलाई परिसरात राहणारे संजय( बंटी) मणिलाल भांडारकर (वय 52) हे रिक्षाचालक आठ जुलैपासून घरातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शोध घेतला असता भांडारकर यांची रिक्षा गोंदूर रोड परिसरात बेवारस स्थितीत आढळून आली. त्यामुळे त्यांचे बरे वाईट झाले असावे, असा संशय आला. त्यामुळे परिवाराने थेट शहर पोलीस ठाण्यात धाव घेत ही माहिती दिली. दरम्यान आठ जुलै पासून भांडारकर यांचा शोध सुरू होता. मात्र त्यांचा पत्ता लागत नव्हता.
अखेर 16 जुलै रोजी तापी नदी पात्रात एक बेवारस मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटवली असता तो भांडारकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात गौरव भांडारकर यांनी त्यांच्या वडिलांचा घातपात झाला असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी तपासाची चक्रे फिरवली. मयत भांडारकर यांची रिक्षा धुळे शहरालगत गोंदुर रोड परिसरात आढळली.
मात्र त्यांचा मृतदेह थेट 50 किलोमीटर अंतरावरील तापी नदीच्या पात्रात आढळला. त्यामुळे हा घातपातच असल्याचा संशय पोलीस निरीक्षक भामरे यांना आला. त्यामुळे त्यांनी तपासाची दिशा ठरवण्यासाठी रिक्षा बेवारस स्थितीत आढळून आलेल्या परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यातून संशयीतांच्या हालचाली टिपण्यात आल्या.
दरम्यान मृतदेह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी पोलीस पथक तपासाच्या उद्देशाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. यावेळी एका व्यक्तीने पोलीस पथक आल्याचे पाहताच संशयित हालचाली करीत पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पाठलाग करत अटक केली. या संशयिताची चौकशी केली असता खुनाचा भयानक प्रकार उघडकीस आला. जुने धुळे परिसरामध्ये राहणारा संशयित आरोपी गणेश पाटील उर्फ भोला काका यांच्या समवेत मयत संजय भांडारकर यांचा पैशांचा व्यवहार झाला होता. यातूनच ही हत्या झाल्याचा आरोप देखील तक्रारीत गौरव भांडारकर यांनी केला आहे .त्यामुळे पोलीस चौकशीत देखील भोला काका याने हा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पुढे येते आहे . मात्र या उन्हामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने पोलीस पथकाने चौघांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.