

धुळे : धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) निरीक्षक पदावर ज्ञानेश्वर वारे या अधिकाऱ्याची झालेली नेमणूक आता तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी या नियुक्तीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सरकार आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईत रंगेहाथ सापडलेले अधिकारी 'डॅशिंग' कसे असू शकतात?" असा संतप्त सवाल गोटे यांनी यावेळी उपस्थित केला.
धुळे जिल्ह्याच्या एल.सी.बी. प्रमुख पदाच्या नियुक्तीवरुन गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु होती. अनेकांनी अनेक अंदाज व्यक्त केले. अखेरीस दोंडाईच्या टेकडीवरुन आदेश सुटले. ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वर वारे यांची धुळे जिल्हा एलसीबीच्या प्रमुख पदावर नियुक्ती झाली. आग असल्याशिवाय धूर निघत नाही. त्याप्रमाणे चर्चा कानावर येत होत्या. तीन कोटींपासून बोली लागल्याची चर्चा एलसीबी पदाची घोषणा होईपर्यंत साडेसहा कोटींपर्यंत पोहोचली. मध्येच कुणीतरी पचकले की, वारेंची नियुक्ती तात्पुरती झाली आहे. शासकीय, नीमशासकीय, अर्थ शासकीय अथा पूर्ण अशासकीय 'कामकाज' पूर्ण झाल्याशिवाय नियुक्तीचे आदेश निघणार नाहीत. राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी 'भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही' असे सांगतात. याचा मला कळालेला अर्थ असा की, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, पण आम्ही पचवून घेवू , असा अर्थ मला कळाल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षातील बलात्कारी, खुनी, बँक बुडवे, भ्रष्ट आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सर्व समाजकंटकांना पक्षात घेऊन आरएसएसच्या मुशीत तयार झालेल्या शिस्तबद्ध भाजपमध्ये सामावून घेण्याचा निर्णयच भाजपने घेतला आहे, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना वारेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्या आदिवासी तालुक्यात त्यांना अटक झाल्यावर संतप्त जनतेने पोलीस गाडीवर दगडफेक केली होती. या प्रकरणात त्यांना तब्बल ४० ते ४५ दिवस जामीन मिळाला नव्हता, असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले गेले, त्याला कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्त करू नये असा नियम आहे. परंतु आपले पालकमंत्री 'सप्तपदी' घेतल्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवून आले आहेत. त्यामुळेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन दोंडाईच्या टेकडीवरील आदेशाने त्यांची एलसीबी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, यातच सर्व काही आले," असा टोला अनिल गोटे यांनी शेवटी लगावला. तसेच, आज जे पत्रकार वारेंना 'डॅशिंग' म्हणत आहेत, त्यांनी वारे लाच प्रकरणात अडकले होते तेव्हाची स्वतःचीच वृत्तपत्रे एकदा काढून वाचावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.