

धुळे : राज्य शासनाच्या ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 17 तालुका कार्यालयांची नाशिक विभागातील उत्कृष्ट कार्यालयांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये शिरपूर, धुळे आणि साक्री तालुक्यातील प्रत्येकी पाच कार्यालयांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात '100 दिवस कृती आराखडा' कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात राज्यातील 358 तालुक्यांतील 10,000 हून अधिक शासकीय कार्यालयांनी सहभाग घेत उल्लेखनीय सुधारणा केल्या. नुकताच या कार्यक्रमाचा विभागनिहाय निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये नाशिक विभागातील धुळे जिल्ह्याचे 17 कार्यालये सर्वोत्तम ठरली आहेत.
कार्यक्रमाच्या मूल्यांकनासाठी 10 प्रमुख मुद्द्यांवर कार्यालयांनी काम केले. यात संकेतस्थळ सुधारणा, जनतेच्या तक्रारींचे निवारण, ई-ऑफिस प्रणाली, सेवासुविधा, गुंतवणूक प्रोत्साहन, डिजिटल प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, तसेच पारदर्शक सेवा वितरण आदी बाबींचा समावेश होता. धुळे जिल्ह्यात या सर्व निकषांवर उल्लेखनीय प्रगती झालेली पहावयास मिळाली.
प्रथम क्रमांक मिळवलेली कार्यालये अशी...
दुय्यम निबंधक, धुळे-2
वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री
द्वितीय क्रमांक मिळवलेली कार्यालये अशी...
उपविभागीय अधिकारी, शिरपूर
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास योजना, शिरपूर-1
बाल संरक्षण अधिकारी, शिरपूर-1
मुख्याधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत, शिरपूर
तालुका क्रीडा अधिकारी, साक्री
गट शिक्षण अधिकारी, धुळे
तृतीय क्रमांक मिळवलेली कार्यालये अशी...
तहसीलदार, शिरपूर
उप अधिक्षक, भूमि अभिलेख, साक्री
गट विकास अधिकारी, शिंदखेडा
पोलिस निरीक्षक, पश्चिम देवपूर, धुळे
सहायक वन संरक्षक/उपविभागीय वन अधिकारी, धुळे
उप अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), साक्री
सहायक पशुसंवर्धन आयुक्त, लघु पशु चिकित्सालय, शिंदखेडा
उपविभागीय जलसंधारण अधिकारी, धुळे
सहायक निबंधक (सहकारी संस्था), साक्री
यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, तसेच महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्यवाही झाली. पालकमंत्री यांनी निवड झालेल्या सर्व कार्यालय प्रमुखांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
"या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढून नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा मिळण्यास मोठी मदत होईल."
जयकुमार रावल, पालकमंत्री, धुळे.