धुळे : कोणताही देश, राज्य आणि पक्षाने आपल्या देशात असणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायाच्या मानसन्मान आणि सर्व हक्कांचे रक्षण केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
धुळ्यात महाविकास आघाडी मधील घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, प्रदेश सदस्य युवराज करणकाळ, माजी नगरसेवक साबीर शेख, माजी उपनगराध्यक्ष इस्माईल पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे तसेच रमेश श्रीखंडे, दरबारसिंग गिरासे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे व हेमंत साळुंखे ,डॉक्टर सुशील महाजन, शानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले तसेच संदीप बेडसे, कामराज निकम, हरिश्चंद्र वाघ ,नंदू येलमामे, माजी महापौर कल्पना महाले, समाजवादी पार्टीचे अमीन पटेल, सरफराज अन्सारी यांच्यासह अनेक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या पक्षातील प्रतिनिधींनी आपले मत मांडले.
बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, प्रत्येक देशाने त्यांच्या देशात असणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायाचा मान सन्मान करून त्यांचे रक्षण केले पाहिजे. भारतात देखील अनेक जमाती अल्पसंख्यांक आहेत. त्यांना देखील संविधानाने जगण्याचे आणि सर्व प्रकारचे अधिकार दिले आहेत. या सर्व जमातींचे रक्षण करण्याची भूमिका आपल्या देशाची राहिली आहे. मात्र अजूनही संविधानाला धोका आहे. भारतीय जनता पार्टीचे सत्तेत असतानाचे राजकारण पाहिले असता या ना त्या कारणाने संविधानाला हात लावण्याचा प्रकार होत असताना दिसतो, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात देशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील जनतेने एकत्र राहून मतदान करण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.