

धुळे : धुळ्यातील सुशी नाल्याच्या पूर रेषेमध्ये असणारी निवासी घरांचे अतिक्रमण तोडण्याचे काम आज हाती घेण्यात आले. या संदर्भात विधानसभेत या अतिक्रमणाचा प्रश्न आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला होता. तर नुकत्याच झालेल्या पाच कंदील चौकातील भाजी मार्केटच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी सुशी नाला अतिक्रमण मुक्त करणार असल्याची घोषणा आमदार अग्रवाल यांनी केली होती. त्यानंतर आज मोठ्या पोलीस फौज फाट्याच्या उपस्थितीत या मोहिमेत सुरुवात झाली.
धुळे शहरातील सुशी नाल्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर निवासी अतिक्रमण वाढलेले आहे. शासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या ठिकाणी अडीचशे पेक्षा जास्त अतिक्रमित घरे आहेत. या अतिक्रमणामुळे नाल्याचा प्रवाह प्रतिबंधित झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ वसाहतीमध्ये शिरून प्राणहानी होण्याची शक्यता निर्माण होते.
परिणामी प्रशासनावर मोठा ताण येतो. याच पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वर्षा नंतर अतिक्रमण काढण्यात येईल ,असे आश्वासन दिले होते. यानंतर पुन्हा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार अग्रवाल यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पाच कंदील चौकातील भाजी मार्केटच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी सुशी नाला हा अतिक्रमण मुक्त करणार असल्याची घोषणाच केली .
यानंतर आज सुमारे 400 ते 500 पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी जेसीबी मशीन घेऊन सुशी नाला परिसरात पोहोचले. यावेळी संबंधित नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे घरातील सामान काढण्यास वेळ देण्यात आला. यानंतर घराचे पक्के बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत 30 ते 40 घरांचे बांधकाम पूर्णपणे तोडण्यात आले आहे. ही मोहीम तीन ते चार दिवस सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.