

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकात नविन मिनी फायटर वाहन दाखल झाले. या वाहनाचा लोकार्पण सोहळा मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी वाहनाचे पुजन करुन वाहनाच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
शासनामार्फत महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडुन सदर मिनी फायटर हे वाहन महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे. अद्ययावत व अत्याधुनिक पध्दतीची सदर वाहनाची रचना असुन दाटीवाटीच्या वस्तीत व रहदारीच्या ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्यास सदर वाहन हे उपयुक्त ठरणार आहे. या वाहनाची सुमारे ३०० लिटर पाणी साठवण्याची क्षमता असुन पेट्रोल किंवा केमिकलमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फोम व्यवस्था सदर वाहनात उपलब्ध आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारणासाठी लागणारे साहित्य वाहनासोबत उपलब्ध आहेत. यात वुडन कटर, हायड्रोलिक जॅक, लोखंडी वस्तु कापण्यासाठी यंत्रणा तसेच अंधारातही वापर करण्यासाठी आवश्यक ती प्रकाश व्यवस्था, प्रथमोपचार साहित्य, आदी साधनांनी परिपुर्ण असे वाहन धुळे महानगरपालिकेस उपलब्ध झाल्याने अग्निशमन विभागाची यंत्रणा बळकट होण्यास मदत होणार आहे.
शुक्रवार (दि.21) झालेल्या या वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी अतिरीक्त आयुक्त करुणा डहाळे, सहायक आयुक्त किशोर सुडके, कार्य. अभियंता नवनित सोनवणे, उपअभियंता चंद्रकांत उगले, नगरसचिव मनोज वाघ, अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, वाहन विभाग प्रमुख अनिल भडागे, वृक्ष समिती अधिकारी रविकिरण पाटकरी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी अमोल सोनवणे, अतुल पाटील, राजन महाले, कुणाल ठाकुर, सचिन करनकाळ, किरण साळवी, निलेश सोनवणे आदी उपस्थित होते.