

Maratha community protest
धुळे : येथे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाबद्दल अर्वाच्य भाषेत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ महेंद्र माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
या संदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन दिले. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या आदिवासी मोर्चात महेंद्र माळीने आपल्या जाहीर भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाजाबद्दल अपमानास्पद शब्दप्रयोग केले. या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांततेला बाधा येईल, अशा हेतूने ते केले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या भाषणाचा व्हिडिओ जिल्ह्यात आणि राज्यात पसरवण्यात आल्यामुळे सर्व शिवप्रेमी आणि मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून थोर महापुरुषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्ये केली जात असल्याची खंत व्यक्त करून, अशा समाजद्रोही व्यक्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.
या वेळी भानुदास बगदे, संदीप पाटोळे, विनोद जगताप, निंबा मराठे, दीपक रौंदळ, बंडू पवार, किशोर वाघ, भैया शिंदे, नरेंद्र हेमाडे, दिनेश चव्हाण, केशव पाटील, आबा कदम, मोतीलाल मराठे, जितू जगताप, मच्छिंद्र मराठे, दिनेश आटोळे, हेमंत भडक, पप्पू माने, प्रमोद साळुंखे, अमर फरताडे, गणेश सूर्यवंशी, ए. बी. पाटील, गोविंद वाघ, वामन मोहिते, उल्हास पाटील, संतोष लकडे, बाळासाहेब ठोंबरे, पवन मराठे, संदीप सूर्यवंशी, नितीन जाधव, कैलास देसले, मनोज जाधव आणि इतर मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.