Dhule LPG crisis : धुळेकर गॅस ग्राहकांनो, अजिबात `पॅनिक’ होऊ नका, गॅस सिलिंडरचा पुरेशा प्रमाणात साठा : आमदार अग्रवाल

पुरवठा अधिकारी, वितरकांच्या बैठकीत घेतला आढावा
Dhule LPG crisis : धुळेकर गॅस ग्राहकांनो, अजिबात `पॅनिक’ होऊ नका, गॅस सिलिंडरचा पुरेशा प्रमाणात साठा : आमदार अग्रवाल
Published on
Updated on

धुळे : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे उद्‌भवलेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गॅस ग्राहकांनी कुठल्याही स्थितीत पॅनिक होऊ नये. शहरातील गॅस वितरकांकडे पुरेशा प्रमाणात गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध असून, रोजच्या रोज पुरेशा प्रमाणात वितरण केले जात आहे. गॅस सिलिंडर बुकिंगबाबत शासनाच्या नव्या नियमावलीनुसार नोंदणी करावी, विनाकारण गॅस एजन्सीवर गर्दी करू नये. काही तक्रारी असतील, तर त्या पुरवठा विभागाकडे कराव्यात, असे आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले आहे.

शहरात काही दिवसांपासून गॅस सिलिंडर वितरणात उडालेला गोंधळ तसेच ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बांगडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत, तालुका पुरवठा अधिकारी हर्षा महाजन आणि शहरातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनीचे गॅस वितरकांची बैठक घेतली.

प्रारंभी शहरातील गॅस वितरकांनी ऑनलाइन बुकिंगमध्ये येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमध्येही अडचणी येत असल्याचे सांगितले. शासनाने नवीन नियमावली जाहीर करत गॅस सिलिंडर नोंदणीसाठी शहरी भागासाठी २५, तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांची मर्यादा केली असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अनेक ग्राहकांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांच्याकडून वारंवर कंपन्यांकडे ऑनलाइन बुकिंगचा प्रयत्न होत आहे. मात्र, बुकिंग होत नसल्याने ग्राहकांमध्ये गैरसमज पसरून गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा झाल्याचे चित्र निर्माण होत आहे. सद्यःस्थितीत शहरातील गॅसची निर्धारित कालावधीत रीतसर नोंदणी केलेल्या ग्राहकांना सुरळीत व पुरेशा प्रमाणात गॅस सिलिंडरचा पुरवठा होत असल्याची माहितीही वितरकांनी दिली. पुरवठा अधिकारी बांगडे यांनी सांगितले की, गॅसचा अवैध वापर व साठा होत असल्याबाबत संशयास्पद ठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यासाठी पथकेही नियुक्त केली आहेत. तसेच सद्यःस्थितीत जिल्हा व तालुका पुरवठा विभागाकडे गॅस सिलिंडरबाबत कुठलीच तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वितरकनिहाय रोजच्या रोज प्राप्त झालेले सिलिंडर, वाटप केलेले सिलिंडर तसेच शिल्लक साठा याची माहितीही आमदार अग्रवाल यांना देण्यात आली.

यावर आमदार अग्रवाल यांनी सांगितले, कंपन्यांच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणी येत असल्याने सद्यःस्थितीत शहरातील सर्व कंपन्यांच्या गॅस सिलिंडर वितरकांनी आपापल्या ग्राहकांना मेसेज करत शासनाच्या नवीन नियमावलीसह गॅस बुकिंगसाठी निर्धारित केलेल्या कालावधीची माहिती द्यावी. गॅस एजन्सीच्या बाहेर सर्व माहितीचे फलक लावावेत, जेणेकरून ग्राहकांना सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. पेट्रोलियम कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरसह कंपन्यांच्या महाव्यवस्थापकांनी गॅस सिलिंडर बुकिंगबाबत ग्राहकांना व्यवस्थित माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये योग्य ते बदल करावेत. पेट्रोलियम कंपन्यांसह वितरकांनी रोजच्या रोज किती सिलिंडरचा पुरवठा केला, किती सिलिंडरचे वाटप झाले, किती साठा शिल्लक राहिला याची इत्थंभूत माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही रोजच्या रोज द्यावी. पेट्रोलियम कंपन्यांसह वितरकांनी धुळे शहरातील ग्राहकांना सुरळीत गॅस सिलिंडर पुरवठा कसा होईल, याचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचनाही केल्या.

यावेळी मोतीलाल सुर्वे, प्रवीण पाटील, गणेश चौधरी, श्रीकांत चव्हाण, रोहित पाटील, तुषार चव्हाण, प्रवीण वावदे, मिलिंद अग्रवाल, निखिल पाटील, मंगेश वाखारकर, हेमंत पाटील, अनिल महाजन, निलेश चौधरी, राकेश माळी आदी विविध गॅस एजन्सीचे वितरक उपस्थित होते.

पुरवठा विभागाने कारवायांवर भर द्यावा

शहरातील सर्वच नोंदणी केलेल्या ग्राहकांना वेळेत व पुरेशा प्रमाणात सिलिंडर वाटप करण्यासाठी पुरवठा विभागासह वितरकांनी संयुक्तपणे काटेकोर नियोजन करावे. तसेच अवैधपणे वाहनांमध्ये गॅस भरणे, हॉटेलसह विविध व्यवसायांच्या ठिकाणी अवैधपणे गॅस सिलिंडरचा साठा होत असल्यास संबंधित संशयास्पद ठिकाणांची माहिती घेत तपासणी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचनाही आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news