

Dhule Jail Break:
धुळे : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील खूनाच्या गुन्ह्यात धुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी पसार झाल्याची घटना घडली आहे. धुळे येथील खुल्या कारागृहात शेती कामासाठी हा कैदी नियमित जात होता. त्यातच त्याने बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केल्याची माहिती दिली जाते आहे. धुळे कारागृहात 21 ते 22 वर्षाचे तरुण शिक्षा बंदी ठेवले जातात.
मात्र हा खुनातील आरोपी ५४ वर्षाचा असल्याने त्याला धुळे कारागृहात स्थानांतरित करण्याचे कारण तपासात पुढे येणार आहे. दरम्यान कैदी पळून गेलेला असताना रात्री उशिरापर्यंत धुळे शहर पोलिसांना याबाबत माहिती का कळवण्यात आली नाही, याबाबत जेल प्रशासनाच्या कारभाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे अंतर्गत भिकन पिंजारी (वय 54) याच्या विरोधात २०१७ मधे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला 30 एप्रिल 2022 रोजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.
त्यानंतर त्याची रवानगी नाशिक येथील कारागृहात करण्यात आली. या कारागृहातून त्याला धुळे येथील कारागृहात नजीकच्या काळातच स्थानांतरित करण्यात आले होते. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना भिकन पिंजारी याची वर्तणूक चांगली असल्याने त्याला धुळ्यात खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
या कारागृहातील बावडी बाग येथे नियमितपणे शेतीकामासाठी त्याला बाहेर काढले जात होते. मात्र काल सायंकाळी शेतीमधून कारागृहात नेण्यासाठी कैद्यांची मोजदात करत असताना भिकन पिंजारी हा उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली.त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ही बाब धुळे येथील कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर रात्री उशिरा जेल विभागाने धुळे शहर पोलीस ठाण्यात कैदी निघून गेल्याची माहिती दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे येथील खुल्या कारागृहात कैद्यांना बाग कामासाठी नेले जात असले तरीही त्या ठिकाणी आवश्यक तो बंदोबस्त पुरवला जातो. या दरम्यान दुपारी जेवण करताना देखील कैद्यांची खात्री केली जाते. मात्र तब्बल रात्री उशीरापर्यंत धुळे पोलिसांना जेल प्रशासनाने कैदी पळून गेल्याची माहिती दिली नाही.
त्यामुळे धुळे पोलिसांना नाकाबंदी करून कैद्याला पकडणे देखील शक्य झाले नाही. विशेष म्हणजे धुळे कारागृहात 21 ते 22 वर्षा वयाचे शिक्षा बंदी ठेवले जातात. मात्र भिकन पिंजारी याचे वय 54 वर्ष असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याला धुळे कारागृहात कसे शिफ्ट केले गेले याविषयीची माहिती मात्र स्पष्ट झाली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेषता 2022 पासून हा कैदी नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र त्याला अचानक धुळे येथे स्थानांतरित करण्यात येऊन त्याला बाग कामासाठी खुल्या कारागृहात का ठेवण्यात आले, याविषयीची माहिती देखील स्पष्ट होऊ शकली नाही. दरम्यान आता धुळे पोलिसांनी या कैद्याच्या पलायनाच्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला असून जेल प्रशासनाच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून याविषयीची माहिती गोळा करणे सुरू झाले आहे. या नंतरच यातील माहिती उघड होणार आहे.