
धुळे : मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि.10) इंडिया आघाडीने जंतर-मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनात धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.
मणिपूरमध्ये एका महिलेची नग्न धिंड काढली जाते, अनेकांचा अमानवी छळ होतो, मात्र या गंभीर घटनेवर सरकार बोलत नाही. संसदेत या प्रकरणी चर्चा व्हावी यासाठी इंडिया आघाडीने तीव्र निदर्शने केली आहेत. धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यादेखील आंदोलनात तीव्रतेने सक्रिय आहेत.
भारतातील मणिपुर हिंसाचाराने पेटले आहे. समाजकंटक उघडपणे दंगली पेटवितात. बेधुंद जमाव एका महिलेची नग्न धिंड काढीत अमानवीय अत्याचार करतो. मात्र त्यावर केंद्र सरकार मौन धारण करते, असा सवाल करीत इंडिया आघाडीने संसदेत मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार नसल्याने इंडिया आघाडीच्या खासदारांनी अखेर जंतर मंतर मैदानावर निषेध करीत आंदोलन पुकारले आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर जोरदार भूमिका घेणारे हेच सरकार मणिपूरमधील अत्याचारांवर का मौन बाळगत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना भेटून मणिपूरमधील घटनांवर संसदेत चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. मात्र, सत्ताधारी पक्ष वेळ देत नाहीत.
देशसेवा करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचा अपमान होत असतांना, त्यावर संसदेत चर्चा न करणं हे सरकारच्या भूमिकेचं गंभीर अपयश दर्शवत आहे. विरोधकांचा आवाज दाबून, संसदेत चर्चा होऊ देण्यास नकारात्मकता दर्शवून सरकार लोकशाहीचा अपमान करत आहे. असा आरोप आंदोलनातून करण्यात आला.
सरकार हुकूमशाहीकडे जाणारी पावले उचलत आहे असा आरोप केला जात आहे. दरम्यान इंडिया आघाडीचे भक्कम नेतृत्व करीत विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी या प्रश्नी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव या पूर्णपणे सक्रिय असून त्यांनी हिंसाचार प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे.