

Ushabai Patil Sarpanch Henkalwadi Tamaswadi Gram Panchayat
धुळे : हेंकळवाडी-तामसवाडी गट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजप समर्थित ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार उषाबाई सतीश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ज्योतिका नरेंद्र पाटील यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच ग्रामविकास पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत उषाबाई पाटील यांना ७०३ मते मिळाली, तर ज्योतिका पाटील यांना ३२४ मतांवर समाधान मानावे लागले. सरपंच पद १४ महिन्यांपूर्वी अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
विजयानंतर समर्थकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नगाव येथील संपर्क कार्यालयात आमदार राम भदाणे यांची भेट घेतली. यावेळी आमदार भदाणे यांनी सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले.
कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, सतीश पाटील, माजी सरपंच संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. हेंकळवाडी-तामसवाडी ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व कायम राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.