Dhule Protest | गोवंश कत्तलीच्या अवशेषांच्या विल्हेवाटीवरून वाद; मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यासाठी गोरक्षण समिती आक्रमक

धुळे शहरात झालेल्या कथित गोवंश कत्तलीचा मुद्दा चांगलाच तापला आहे
Gorakshan Samiti Agitation vs Municipal Commissioner
Pudhari
Published on
Updated on

Gorakshan Samiti Agitation vs Municipal Commissioner

धुळे: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात झालेल्या कथित गोवंश कत्तलीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेच्या माध्यमातून जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप करत गोरक्षण समितीने तीव्र भूमिका घेतली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी समितीच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कचरा डेपो परिसरात दरवर्षीप्रमाणे दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले होते. याच ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकृत घंटागाड्यांमधून जनावरांचे अवशेष आणून जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे खोदून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Gorakshan Samiti Agitation vs Municipal Commissioner
Dhule Crime : शिरपूर पोलिसांचा दणका : दहिवद शिवारात दीड लाखांची अवैध दारू जप्त

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आणि माहिती गोरक्षक विकास गोमसाळे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गोरक्षक संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेला हा मोर्चा विविध मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

निवेदनात, राज्यात गोवंश कत्तलीवर कायदेशीर बंदी असताना धुळ्यात पोलिस बंदोबस्तात कत्तल झालेल्या जनावरांच्या अवशेषांची महानगरपालिकेच्या वाहनांद्वारे विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.

गोरक्षकांनी यावेळी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली. तसेच गोवंश कत्तलीत सहभागी असलेल्या कसायांविरोधात कठोर कारवाई करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

महानगरपालिकेच्या घंटागाड्यांचा वापर आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, त्यांच्याविरोधातही दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात यावेत, अन्यथा गोरक्षकांच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

या प्रकरणामुळे धुळे शहरातील वातावरण तापले असून, प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news