

धुळे : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार (दि.22) रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे. कार्यक्रमास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सोहळ्याची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या भगवान बिरसा मुंडा सभागृहात पत्रकार परिषदेत नरवाडे बोलत होते. ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील मंजूर 93 हजार उद्दिष्टांपैकी सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे.