

धुळे : येथील महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्रात बुधवार (दि.2) ऑक्टोबर राष्ट्रपित्याच्या विचारांचा जागर करण्यात आला. परिसर स्वच्छता आणि वृक्षारोपण करीत असतानाच गांधी वंदना घेण्यात आली. यावेळी महात्मा गांधी जयंती सप्ताहाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या निमित्ताने जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई वहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संचलित, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून दि. ०२ ते ०८ ऑक्टोंबर या कालावधीत महात्मा गांधी जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाचा प्रारंभ आज २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती दिनी महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्रात गांधी वंदना, परिसर स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी सर्व स्थानिक सल्लागार समिती सदस्य,धुळे शहर व परीसरातील महाविद्यालयातील प्राचार्य, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व गांधी प्रेमी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी श्याम-घनश्याम लाईव्ह कन्सर्टचे संचालक प्रा. डॉ. घनश्याम थोरात व प्रा. अरुण ढमढेरे व अमृत दाभाडे यांनी गांधी वंदना सादर केली. प्रारंभी कार्यकारी संचालक, डॉ.संजय ढोडरे यांनी प्रास्ताविकातून गांधी सप्ताह अंतर्गत केंद्राच्या वतीने धुळे शहर व परिसरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व गांधी विचार आणि मूल्य समाज-घटकात रुजवण्यासाठी होत असलेले प्रयत्न याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील होते.तर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पवन पोद्दार, डॉ.शिवाजी पाटील, डॉ.मोहन पावरा ,नितीन ठाकूर, यशवंत हरणे,डॉ.डी.एस.सुर्यवंशी, डॉ.साजेदा शेख तसेच प्राचार्य डॉ.के.बी.पाटील, बी.एम.पाटील,प्राचार्य डॉ.संजीव गिरासे , प्राचार्य डॉ.प्रभाकर महाले, प्राचार्य डॉ.एस. जी. बाविस्कर, डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ. सतीश निकम, डॉ.बडगुजर, डॉ चंद्रशेखर वाणी, प्रा.उज्वला वाणी, अनिल वाणी, यांच्या सह गांधी प्रेमी, शहरातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्राचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ.संजय ढोडरे, अमृत दाभाडे व गणेश गवळी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. नरहर भावे व कै.शिवाजी भावे या पिता-पुत्रांच्या स्मृतिस्थळाला पुष्प वाहण्यात आले, नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गांधी जीवन चित्रप्रदर्शनी केंद्र परिसरात लावण्यात आली होती. त्याचाही लाभ मान्यवरांनी घेतला. तसेच "एक पेड मां के नाम" या कार्यक्रमांतर्गत केंद्र परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.