

धुळे: हाँगकाँग येथील सनशाइन इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीची तीन लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलरची (भारतीय चलनात तीन कोटी 12 लाख रुपये) फसवणूकप्रकरणी धुळ्यातील कंपनी मालक रामप्रसाद अग्रवाल व त्याच्या संचालक मंडळाच्या नऊ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदूर येथील रहिवासी मनीष गोविंद शर्मा यांनी धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखा येथे तक्रार केली होती. त्यांची हाँगकाँग येथील सनशाइन इंटरनॅशनल प्रा.लि. ही कमिशन बेसीसवर वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. धुळे औद्योगिक वसाहतीमधील सनलिंक फोटो व्होल्टिक व तेजस इंपेक्स (पुणे) कंपनीचे मालक रामप्रसाद अग्रवाल व संचालकांना सोलरचे उत्पादन करण्यासाठी कच्चा माल खरेदी करावयाचा होता. त्यासाठी त्यांना तीन लाख 66 हजार 852 अमेरिकन डॉलरची (भारतीय चलनात 3 कोटी 12 लाख रुपये) विदेशी चलनाची आवश्यकता होती. शर्मा यांच्या कंपनीशी रामप्रसाद अग्रवाल व संचालकांनी संपर्क साधत वित्तपुरवठ्यासाठी विनंती केली होती.
सनशाइन इंटरनॅशनलने रामप्रसाद अग्रवाल व संचालकांना दक्षिण कोरियास्थित हानवा टोटल्सकडून कच्चा माल खरेदीसाठी सन 2021 मध्ये वित्तपुरवठा केला होता. बराच कालावधी उलटल्यानंतर अग्रवाल यांनी "सदरचा माल हा खराब होता" असा बनाव करून या फायनान्स कंपनीची घेतलेली रक्कम परत केली नाही. शर्मा यांनी याप्रकरणी धुळ्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासानंतर रामप्रसाद अग्रवाल व संचालक हनुमानप्रसाद अग्रवाल, राकेश अग्रवाल, स्नेहा अग्रवाल, पवन अग्रवाल, नारायण अग्रवाल, मनीषा अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, शीलाबाई अग्रवाल यांच्याविरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.