

Kunal Patil Birthday Controversy
धुळे : एकीकडे पंतप्रधानांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा होतो आहे. तर धुळे जिल्ह्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटलांच्या घुंगरांच्या आवाजावर ठेका धरत आहेत. शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना कुणीही वाली नाही. विरोधी पक्षाचे ऐकायचेच नाही, असे सत्तारूढ भाजपाने पक्के मनापासून ठरवले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष कितीही बेंबीच्या देठापासून ओरडला तरी, त्याकडे लक्ष द्यायचे नाही, अशा एकंदरीत मानसिकतेत धुळे जिल्ह्यातील शेतकरी पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाही हेच विदारक सत्य असल्याची जोरदार टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.
धुळे जिल्ह्यात फक्त 65 टक्के पाऊस, तरीही दुष्काळ का जाहीर केला नाही,भाजपाच्या मते धुळे जिल्ह्यात दुष्काळ नाही, अशा पद्धतीने नेते वागत आहे. दुष्काळाकडे आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे पाठ फिरवणाऱ्या या महायुतीच्या आमदारांना कसलेही सोयर सुतक वाटत लाज वाटत नाही.धुळे जिल्ह्याची अवहेलना अजून किती वर्ष सहन करणार, असा जळजळीत प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला.
धुळे जिल्ह्यात, प्रामुख्याने धुळे व शिंदखेडा तालुक्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री लहान मुलांप्रमाणे गणपतीच्या मंडळासमोर केलेल्या देखाव्यांची मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत. याउलट ग्रामीण भागात अत्यंत विदारक स्थिती असून सलग ४५ दिवसापेक्षा जास्त काळ परिणामकारक पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. हवालदिल शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरमहा मिळणारे प्रति ५ किलो धान्य आणि इतर आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करायला मजूरही मिळत नाही. आता तर मजूर वर्गाची अवस्था देखील अत्यंत बिकट झाल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर केंद्राचे शिष्टमंडळ येईल, पाहणी करेल, अहवाल देईल, या सर्व गोष्टी भंपक आहे. देशातील उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे बँकांचे थकलेले कर्ज, एका क्षणात मोदी सरकारने माफ केले. मागच्या आठवड्यात सुभाष चंद्रा यांच्याकडील थकीत २२ हजार कोटी रुपयांच्या कर्जापासून, फक्त साडेसहा कोटी रुपये भरून, त्यांना कर्जमाफी दिली. परंतु वंशपरंपरागत, पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या अन्नदात्याचे कर्ज माफ होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे, अशी टीका देखील अनिल गोटे यांनी केली.