

Shops caught fire Dhule
धुळे : शहरातील चाळीसगाव रोड परिसरात आज (दि.१४) पहाटे लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चाळीसगाव रोडवरील सूर्या जिमजवळ असलेल्या नंदिनी मेडिकल, शिवसागर रद्दी केंद्र तसेच एका ट्रॅव्हल्सच्या दुकानातून पहाटेच्या सुमारास धुराचे लोट बाहेर येताना काही नागरिकांच्या निदर्शनास आले. सध्या रमजान महिना सुरू असल्याने प्रार्थनेसाठी धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या नागरिकांनी ही बाब तात्काळ संबंधितांना कळवली. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
दरम्यान, काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत दुकानांच्या बाहेर ज्वाळा दिसू लागल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सकाळपर्यंत मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत वैद्यकीय साहित्य, रद्दीचा साठा तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती दुकान चालक मयूर गायकवाड व कदम यांनी दिली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.