

धुळे : काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने खचून न जाता हिंमतीने काम करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी.एम. संदीप यांनी केले. काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेस पक्षाला इतिहासाची परंपरा आहे. पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस संपुष्टात येऊ शकत नाही. सत्ता मिळाल्यावर अनेक जण सत्तेसोबत जातात, मात्र पराभवाच्या प्रसंगी जो पक्षासोबत राहतो तोच खरा एकनिष्ठ कार्यकर्ता असतो. युवकांनी पुढे येऊन जनतेच्या समस्यांसाठी संघर्ष करावा आणि कार्यकर्त्यांनी त्यांना संधी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी बी.एम. संदीप यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी बूथस्तरावर नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक गावात बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करावी, तसेच सक्रिय कार्यकर्त्यांना पक्ष पातळीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या द्याव्यात, असे सांगितले.
या बैठकीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, भटक्या विमुक्त सेलचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रदेश उपाध्यक्ष युवराज करनकाळ, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, संचालक साहेबराव खैरनार, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ. अनिल भामरे, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, कृषीभूषण भिका पाटील, माजी सरपंच धनराज पाटील, डॉ. दत्ता परदेशी, युवा नेते प्रविण चौरे, साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, मालेगाव काँग्रेस प्रवक्ता जैनू पठाण, मालेगाव काँग्रेस उपाध्यक्ष अबु बकर चौधरी, सचिव अख्तर शेखनूर, हाशीम अन्सारी, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, अशोक राजपूत, प्रमोद सिसोदे, सेवा दलाचे अध्यक्ष आलोक रघुवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे यांनी सूत्रसंचालन केले.