Dhule Fake currency fraud: फेक करन्सीच्या आमिषाने लूट करणाऱ्या टोळीतील एकाला अटक; ९५ हजारांची रोकड जप्त

इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बनावट (फेक) भारतीय चलन मिळवून देण्याचे आमिष
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

धुळे: इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बनावट (फेक) भारतीय चलन मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांना निर्जनस्थळी बोलावून लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून लुटीतील ९५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील काही तरुणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इन्स्टाग्राम व फेसबुकवर फसव्या रिल्स प्रसारित केल्या होत्या. या रिल्समध्ये "१ लाखांच्या मोबदल्यात ७ लाख", "२ लाखांच्या मोबदल्यात १५ लाख" अशा आकर्षक ऑफर्स देत बनावट भारतीय चलन उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले जात होते.

या रिल्सवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तींशी आरोपी विश्वास संपादन करून करन्सी दाखविण्याच्या बहाण्याने अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील निर्जनस्थळी बोलावत असत. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवून, शिवीगाळ व मारहाण करत पीडितांकडील रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने लुटण्याचे प्रकार सुरू होते.

भीतीपोटी अनेक पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे या प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचत नव्हती. मात्र, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी करत होते. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोउनि कैलास माळी, पोउनि प्रशांत राठोड तसेच रविंद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, महेंद्रसिंग गिरासे, भावेश झिरे आणि सुरेंद्र खांडेकर यांच्या पथकाने संशयित आरोपी सुनील ऊर्फ अविनाश शंकर भोसले याला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार सहभागी असल्याचे उघड झाले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांनी आरोपीकडून लुटीतील ९५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news