

धुळे : आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया, ई-मेल यासारख्या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारीचा धोका देखील वाढत आहे. त्यामुळे इंटरनेट सुरक्षिततेबाबत प्रत्येक नागरीकाने जागरूक राहणे आणि आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी जगभरात 11 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त सी डॅक, इलेक्ट्रॉनिक एव सूचना प्रौद्योगिक मंत्रालय, तसेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्यावतीने एक दिवसीय कार्यशाळा झाली यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, सीमा अहिरे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, तहसिलदार प्रविण चव्हाणके, नगरविकास अधिकारी अभिजित बाविस्कर, नायब तहसिलदार गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. या वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारीचा धोका देखील वाढत आहे. अशा सायबर गुन्हेगारीसाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणा काम करत असते. आज देशात इंटरनेट सुरक्षितता ही महत्वाची बाब असून पुढच्या दहा वर्षांत अनेक व्यक्तीं या सायबर गुन्हेगारीस बळी पडू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे. कोणीही सोशल मीडियावर वैयक्तींक माहिती, छायाचित्र प्रसारीत करु नये, कार्यालयातील संगणक, वैयक्तिक व्हॉटसॲप, फेसबुकवरील माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी खडसे यावेळी पीपीटीद्वारे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. आपला ओटीपी, आधार क्रमांक, पॅन कार्ड माहिती, बँक तपशील किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. अनोळखी वेबसाइट किंवा फॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती टाकताना सतर्क राहा. सुरक्षित संकेतशब्द (पासवर्ड) वापरा. प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे आणि मजबूत पासवर्ड ठेवा. पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हे यांचा समावेश असावा. पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा आणि ते कोणालाही सांगू नका. संशयास्पद लिंक आणि ईमेल उघडण्याचे टाळा. ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षितता राखा. केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह संकेतस्थळांवरूनच खरेदी करा. सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरताना बँकिंग किंवा महत्त्वाचे लॉगिन करू नका. सोशल मीडियावर सुरक्षितता पाळा. अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. सोशल मीडियावरील गोपनीयता सेटिंग्ज तपासून ठेवावेत. फिशींग वेबसाईट, फिशिंग ईमेल, विशिंग, आर्थिक फसवणुक, वैयक्तिक माहिती चोरी करणे, लॉटरी स्कॅम, फेक ॲप, कार्यालयीन संगणकावरील सुरक्षा, सॉफ्टवेअर अपडेट याबाबतही त्यांनी माहिती दिली. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.