

धुळे : वीज वितरण कंपनीच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून बोलेरो पिकअप गाडी आणि ४५० फूट ॲल्युमिनियमची तार असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या खांबांवरील ॲल्युमिनियम तारा चोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. जुनवणे परिसरातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेताजवळून वीजतार चोरी झाल्याची तक्रार वीज वितरण कंपनीचे कर्मचारी संजय सिताराम वळवी यांनी दिली होती. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळाचे अवलोकन करून गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी दादाभाऊ ईश्वर महाले, आतिश किरण शिरसाठ, विकी सुभाष कोळी, रामदास बालू कोळी आणि अनिकेत राजेंद्र कोळी (सर्व रा. शिरूड) अशी त्यांची नावे असून, त्यांनी धुळे तालुक्यातील विविध भागात अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी सुरू असून, या तपासातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.