

धुळे : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तवदर्शी पंचनामे करून त्यांना योग्य भरपाई आणि आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्यांनी रविवारी (दि. 27) धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शासकीय मदत प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने नार्वेकर यांनी गोंदूर आणि निमडाळेसह विविध गावांमध्ये जाऊन कापूस, मका व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. दुष्काळ जाहीर होणे ही प्रक्रियेची केवळ सुरुवात असून, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पंचनाम्यात प्रत्येक बाधित क्षेत्राचे वास्तव समोर आले पाहिजे आणि एकही पात्र शेतकरी केवळ तांत्रिक कारणांमुळे मदतीपासून वंचित राहू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला दिल्या.
धुळे शहरालगतच्या पाच किलोमीटर परिसरातील काही बाधित शेतकऱ्यांची नावे लाभाच्या यादीत नसल्याची बाब शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर प्रशासनाकडून माहिती घेऊन पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नुकसानभरपाई, पीक कर्ज, वीज, पिण्याचे पाणी आणि चारा यांसारखे प्रश्न शासन दरबारी व विधिमंडळात मांडले जातील, असेही त्यांनी नमूद केले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही प्रशासनाची संवेदनशील बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, उपसभापती संभाजी राजपूत, रायबा कुणाल पाटील, हर्षल साळुंखे, प्रभाकर भामरे, प्रांताधिकारी रोहन कुंवर आणि कृषी उपसंचालक प्रज्ञा पवार यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.