

सोनगीर : धुळे जिल्ह्यात सध्या भासत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पुढील आठवड्यात प्रत्येक शिधापत्रिका धारक कुटुंबाला मिळणार ३ लीटर रॉकेल. जिल्ह्यासाठी ६ टँकर मंजूर करण्यात आले असून तब्बल ७२ हजार लीटर रॉकेल साठ्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना रॉकेल वितरणाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील ८ दिवसात नियोजनबद्द पद्धतीने प्रत्येक शिधापत्रिकावर एका कुटुंबाला ३ लीटर रॉकेल वितरण करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडे म्हणाले की, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत एकूण ६ टँकर मंजूर झालेले आहे आणि ७२ हजार लीटर रॉकेल प्राप्त होणार आहे. त्याअनुषंगाने तालुका निहाय नियोजन करून आणि भाव निश्चित करून रॉकेल वितरण करण्यास सुरुवात होणार आहे.
शिधापत्रिका धारकांना तर वाटप करायचेच परंतु जर कुणा गरजूकडे शिधापत्रिका नसेल तर त्यांना सुद्धा रॉकेल वितरण करण्याबाबतचे शासनाचे आदेश आहेत. आठवड्याभरामधे रॉकेल प्राप्त होईल. आणि परिस्थिती जर अशीच राहिली तर भविष्यातही रॉकेल वितरण सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत तहसील कार्यालयात नियोजन करून अर्धघाऊक परवाने धारकांचे नूतनीकर करण्यात आलेले आहे. तसेच कोणत्या गावांमध्ये वितरण करायचे आहे त्याबाबत नियोजन करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.