

Deur Mhasadi Road ST Bus Truck Collision
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील देऊर-म्हसदी रस्त्यावर विश्वेश्वर महादेव मंदिराजवळील वळणावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ४५ विद्यार्थिनी जखमी झाल्या. वळणावर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारा ट्रक बसचालकाला वेळीच दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली.
धुळे आगाराची एमएच ०६ एस ८५८९ क्रमांकाची एसटी बस सकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरखेडमार्गे म्हसदीकडे मानव विकास मिशनच्या ७५ विद्यार्थिनींना घेऊन निघाली होती. सकाळी सुमारे सात वाजता विश्वेश्वर महादेव मंदिराजवळील वळणावर बस आली असता समोरून येणाऱ्या एमएच १८ एए ५८८८ क्रमांकाच्या ट्रकशी तिची जोरदार धडक झाली. हा ट्रक जायखेडाहून धुळ्याकडे जात होता.
धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून समोरील काचेलाही तडे गेले. अपघातानंतर जखमी विद्यार्थिनींना तातडीने म्हसदी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी २५ विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थिनींचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेतली. एसटीचे सहाय्यक वाहतूक अधिकारी कुणाल घरमोडे, विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी सागर घरमोडे यांच्यासह अधिकारी व शिक्षकांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाहने नेर पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. ट्रकचालक वाहिद पठाण यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताच्या वेळी बसमध्ये अचानक मोठा आवाज झाल्याने विद्यार्थिनींमध्ये घबराट पसरली. क्षणभर नेमके काय झाले, हेच समजले नाही. काही विद्यार्थिनींच्या हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली.
‘जायखेडाहून धुळ्याकडे जात असताना ट्रक माझ्या बाजूने व्यवस्थित चालवत होतो. त्याचवेळी समोरून येणारी एसटी बस अचानक जोरात समोर आली आणि आमची समोरासमोर धडक झाली. अपघाताचा क्षण अत्यंत भीषण होता. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली,’ असे ट्रकचालक वाहिद पठाण यांनी सांगितले.