Dhule Crime : धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तीन अट्टल घरफोड्यांना अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत

Dhule Crime : धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तीन अट्टल घरफोड्यांना अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
Published on
Updated on

धुळे : शहरातील देवपूर परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने अटक केली आहे. या तिन्ही चोरट्यांनी प्राथमिक चौकशीतच आणखी तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली असून, चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. शहरातील देवपूर परिसरातील अक्षय कॉलनीमध्ये राहणारे अमोल देविदास पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एकूण १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून समांतर तपास करत असताना, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना हा गुन्हा सलमान जावेद खान, अफताब शरीफ शेख आणि हरीष ऊर्फ सनी कैलास चौधरी यांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. हे आरोपी देवपूर बस स्टँडच्या पाठीमागे, कब्रस्तानजवळील नाल्याजवळ बसलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने, पोलीस निरीक्षक पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे व अंमलदारांचे पथक तयार केले. त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. या पथकाने देवपूर बस स्टँडच्या पाठीमागील कब्रस्तान जवळील नाल्यावरून सलमान जावेद खान, अफताब शरीफ शेख ऊर्फ अप्पू, हरीष ऊर्फ सनी कैलास चौधरी (सर्व राहणार विटाभट्टी, देवपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल विचारपूस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि चोरीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला.

यात पोलिसांनी सलमान जावेद खान याच्या अंगझडतीत ३६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन रिंग, १ हजार ३८० रुपये किमतीची पांढऱ्या धातूची चैन आणि फिर्यादी यांच्या घरातील एक कुकरी व एक लोखंडी टॅमी जप्त केली. तसेच अफताब शरीफ शेख ऊर्फ अप्पू याच्या अंगझडतीमधून ४ हजार ८०० रुपये आणि १ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे दोन कडे, चांदीची साखळी व २० हजार रुपये किमतीचा 'टेक्नो स्पार्क' कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आला. तर तिसरा आरोपी हरीष ऊर्फ सनी कैलास चौधरी याच्या अंगझडतीतून १ हजार १०० रुपये किमतीच्या चांदीच्या दोन साखळ्या आणि गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

या तिन्ही आरोपींकडे अधिक सखोल चौकशी केली असता, त्यांनी देवपूरमधील अक्षय कॉलनीतील बंद घर, तसेच श्रीगुरु कॉलनी येथील बंद घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून वरील सर्व मुद्देमाल चोरी केला होता व तो आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आरोपी सलमान जावेद खान याच्याविरुद्ध यापूर्वी ४ गुन्हे, अफताब शरीफ शेख ऊर्फ अप्पू याच्याविरुद्ध ३ गुन्हे, तर हरीष ऊर्फ सनी कैलास चौधरी याच्याविरुद्ध यापूर्वी ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news