

धुळे : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या जामन्यापाणी वनक्षेत्रालगत असणाऱ्या तीन गावांमध्ये सुमारे 90 गुंठे क्षेत्रावर गांजा या अमली पदार्थाच्या पिकाची लागवड करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि वनविभाग यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे सात कोटी 68 लाख रु. किं.चे एकूण 3,072 किलो गांजा झाडांचे पिक नष्ट करण्यात आले आहे या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामन्यापाणी वनक्षेत्रालगत आजुबाजूचे परिसरात अज्ञात इसमांनी कॅनाबीस वनस्पतीची (गांजा झाडांची) लागवड केली असल्याची गोपनिय माहिती वनविभाग व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक हिरे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार उपवनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) मोहन नाईकवाडी यांनी देखील कारवाईसाठी त्यांचे पथक तयार केले.
दरम्यान पोलीस प्रशासनाने मुख्य न्यायदंडाधिकारी यांना गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कायदा कलम 52अ प्रमाणे दुर्गम भागातील गांजा वाहुन आणणे शक्य नसल्याने, त्याचठिकाणी इन्व्हेंटरी ( न्यायालयाच्या देखरेखीखाली मालमत्तेची तयार केलेली अधिकृत आणि कायदेशीर यादी) करुन मुद्देमाल नष्ट करण्यासाठी न्यायालयाचे आदेशान्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची छापा कारवाई करिता नियुक्ती करण्याची विनंती केली. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, वन परिक्षेत्रीय अधिकारी विशाल दुसाणे, कैलास सोनवणे, सुनिल जोग, किरण गिरवले , पोउनि मनोज कचरे , पोउनि. हेमंत खैरनार ,पोउनि. मिलींद पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाणे व वनविभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या अति दुर्गम भागातील नियतक्षेत्र भोरखेडा, रोहीणी, खंबाळे येथील एकुण 90 गुंठे क्षेत्रावर छापा टाकला. यात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा कॅनाबीस वनस्पती (गांजा सदृश्य) अंमली पदार्थ अवैधरित्या कॅनाबीस वनस्पतीची लागवड केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार न्यायालयाच्या निर्देशानुसार
शिरपूर तालुका पोलीस ठाणे व वनविभागाने संयुक्तरित्या अति दुर्गम भागातील नियतक्षेत्र भोरखेडा, रोहीणी, खंबाळे येथील एकुण 90 गुंठे क्षेत्रावरील एकुण 7,कोटी 68, लाख रु. किं.चा 3072 किलो मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा कॅनावीस वनस्पती (गांजा सदृश्य) ची झाडे जागीच नाश करुन, 10 गुंठे क्षेत्रातील 100 किलो कॅनाबीस वनस्पतीचे झाडे पुढील कायदेशीर सोपस्कर करीता जप्त करण्यात आली आहेत. छापा कारवाई दरम्यान आरोपी हुकला भिकला पावरा,( रा. खंबाळे ता. शिरपूर) याचे नाव निष्पन्न झाले असून त्याच्या नावाने वनपट्टा क्रमांक प्राप्त करण्यात आला आहे. छापा कारवाई बाबत शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपवनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच सहायक वनसंरक्षक राहुल घरटे यांच्या उपस्थितीत कार्यकारी दंडाधिकारी महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.