Dhule Crime : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आंतरराज्य गॅस काळाबाजार रॅकेट उद्ध्वस्त; १०५ सिलेंडरसह टँकर जप्त

पिंपळनेर महसूल आणि पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार
dhule crime
Published on
Updated on

अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर-दहिवेल राष्ट्रीय महामार्गावरील 'राजस्थानी बालाजी हॉटेल' (दाळबाटी धाबा) येथे महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी धडक कारवाई केली. काल, मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये अवैधरित्या एलपीजी गॅस सिलेंडरचा साठा करून व्यावसायिक हॉटेल्सना मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कारवाईची चाहूल लागताच आरोपी वाहन चालक आणि सहचालकाने अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. पोलीस सध्या या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

या धडाकेबाज कारवाईदरम्यान प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचे साहित्य आणि वाहने जप्त केली आहेत. यामध्ये भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर (क्रमांक KA-01 AE-365) आणि गॅसची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी दोन महिंद्रा बोलेरो वाहने (क्रमांक GJ-19 Y-8316 व GJ-06 AU-3662) तसेच एक मारुती सुझुकी कार (क्रमांक MH-18 BG-8667) जप्त करण्यात आली आहे. या वाहनांसोबतच १०५ कमर्शियल गॅस सिलेंडर आणि टँकरमधून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाईप आणि इतर आधुनिक उपकरणे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत.

या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण साक्री आणि पिंपळनेर परिसरात एकच खळबळ उडाली असून, या काळ्याबाजाराचे धागेदोरे महाराष्ट्रासह थेट गुजरात राज्यापर्यंत पोहोचले असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही संपूर्ण कामगिरी पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथक आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) नामदेव सहारे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वी केली. या धाडसी कारवाईत साक्रीचे पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, महसूल विभागाचे जयवंत पाटील, भारत देसले, सुभाष गिरी, गणेश माळी, विकास पाटील, मुकेश विसपुते यांच्यासह सर्व महसुली सहाय्यकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच पोलीस विभागाचे उपनिरीक्षक संदीप संसारे, पीएसआय राजेंद्र मोरे, एएसआय अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ आणि दावल सैदाणे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आरोपींच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news