पिंपळनेर, (जि.धुळे) : साक्री तालुक्यातून ट्रॅक्टर ट्रॉली लांबविणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत आठ दिवसांपूर्वी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
अधिक वृत्त असे की, साहेबराव शंकर पाटील (58), रा. धनेर, ता.साक्री या माध्यमिक शिक्षकाच्या खळ्यातील कांद्याच्या चाळीचे गेटचे कुलूप तोडून दि. 24 जूनला सायकांळी सात ते दि. 25 पहाटे पाच वाजेच्या दरम्यान चोरट्याने तीन लाख रूपये किंमतीचा ट्रॅक्टर व 50 हजार रूपये किंमतीची ट्रॉली असा एकूण साडेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रकरणी साहेबराव पाटील यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल झाला. या चोरीचा तपास करण्यासाठी पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस यांनी विशेष पथक नियुक्त केले होते. यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसांनी मोहसीन ऊर्फ मुसा उस्मान मिर्झा,(31), रा.नवापूर यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने त्याचा साथीदार विकास(पुर्ण नाव निष्पन्न नाही),रा.वरकुट,ता. नवापूर याचे मदतीने केल्याची कबुली दिली. या कारवाईत तीन लाख रूपये किंमतीच्या ट्रॅक्टरसह 50 हजार रूपये किंमतीची ट्रॉली असा एकूण 3 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून साथीदाराचा शोध सुरू आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली केली कारवाई सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी.
पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस, असई लक्ष्मण गवळी, बापु पिंपळे, पोहेकॉ वामन चौधरी, पोकों रविंद्र सुर्यवंशी, पंकज वाघ, भारत बागुल, विजयकुमार पाटील या पथकाने केली.