Dhule Crime : थकीत वेतन काढून देण्यासाठी दोन हजारांची लाच; आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अटक

Bribery Case
Bribery CasePudhari
Published on: 
Updated on: 

धुळे : शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथील आदिवासी शासकीय प्राथमिक आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्याचे थकीत वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सुनील खेडकर असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे जामण्यापाडा येथील आदिवासी शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत रोजंदारी तत्त्वावर चौकीदार म्हणून एप्रिल २०२६ पर्यंत कार्यरत होते. या कालावधीतील त्यांचे वेतन थकीत असल्याने त्यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील खेडकर यांची भेट घेतली. यावेळी थकीत वेतन अदा करण्यासाठी खेडकर यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी आठ हजार रुपये त्यांनी तक्रारदाराकडून फोन-पेद्वारे तत्काळ स्वीकारले.

दरम्यान, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रारदाराच्या बँक खात्यात २२ हजार ८२५ रुपयांचे थकीत वेतन जमा झाले. त्यानंतर मुख्याध्यापक खेडकर यांनी तक्रारदाराला वारंवार फोन करून उर्वरित दोन हजार रुपयांची लाच देण्याचा तगादा लावला. वेतन खात्यात जमा करून दिल्याच्या मोबदल्यात ही रक्कम द्यावीच लागेल, अशी मागणी त्यांनी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची पडताळणी उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पडताळणीदरम्यान मुख्याध्यापक खेडकर यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे उर्वरित दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम स्वीकारण्याचेही त्यांनी मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्यासह राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील आणि रामदास बारेला यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी खेडकर यांनी पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.