Dhule Collector : इतरांसोबत पांढरे रेशन कार्डधारकांनी सुद्धा जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा
धुळे : राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य आरोग्य हमी सोसायटी अंतर्गत एकत्रीत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना राबविली जात आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
पिवळे, केशरी, अंत्योदय सोबतच पांढरे रेशन कार्डधारक लाभार्थींना देखील आता आरोग्य संरक्षणाचा लाभ
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत 28 जुलै, 2023 च्या शासन निर्णयानुसार आरोग्य संरक्षण प्रती वर्ष प्रतिकुटूंब रु.1.5 लक्षावरुन प्रतिवर्ष प्रतिकुटूंब 5 लाख इतके करण्यात आले आहे. या योजनेमध्ये 1 हजार 356 आजारावर उपचार करण्यात येत आहे. 1 हजार 356 आजारावरील उपचारापैकी 119 आजारांवर उपचार केवळ शासकीय रुग्णालयांकरीता राखीव केले आहे. 28 जुलै, 2023 च्या शासन निर्णयानुसार योजनेचे विस्तारीकरण करुन पिवळे, केशरी, अंत्योदय सोबतच पांढरे रेशन कार्डधारक लाभार्थींना देखील आता आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
जनआरोग्य मित्राची घ्या मदत
धुळे जिल्ह्यात या योजनेतंर्गत शासकीय व खासगी रुग्णालये मिळून एकूण 42 रुग्णालये अंगीकृत आहेत. या रुग्णालयांमध्ये योजनेतंर्गत पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. योजनेचा लाभ देणाऱ्या रुग्णालयात जनआरोग्य मित्राची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेबाबत काही अडचण असल्यास अथवा माहिती जाणून घ्यावयाची असल्यास आरोग्य मित्राशी संपर्क साधता येतो.
टोल फ्री क्रमांकावर 24 तास संपर्क सेवा
लाभार्थ्यांना लाभ घेतांना काही अडचणी असल्यास किंवा मदतीकरीता टोल फ्री क्रमांक 155388/18002332200 वर 24 तास संपर्क सेवा उपलब्ध आहे. या योजनांचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगांवकर यांनी दिली आहे.

