Dhule News | धुळ्याच्या पाच कंदील चौकातील चारही मार्केटचे काम वर्षभरात पूर्ण करणार...

आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती
Dhule News | धुळ्याच्या पाच कंदील चौकातील चारही मार्केटचे काम वर्षभरात पूर्ण करणार...
Published on
Updated on

धुळे : धुळे शहरातील पाच कंदील चौकात असणाऱ्या चारही मार्केटचे पुनर्निर्माण एका वर्षाच्या आत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. यासाठी गाळेधारकांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या आहे.

धुळे शहरातील पाच कंदील चौकामध्ये कापड, फळ, भाजीपाला आणि धान्य विक्री करण्यासाठी ब्रिटिश काळापासून मार्केट तयार करण्यात आले आहे. या मार्केटची सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे . या मार्केटचे पुर्ननिर्माण करण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेक वेळेस झाले. मात्र न्यायालयीन दाव्यामुळे हे काम रखडले होते. पण आता हा अडथळा दूर झाल्यामुळे या मार्केटचे पुनर्निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धुळे महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेतील मनपा मालकीचे पाचकंदील येथील शिवाजी मार्केट तसेच लाल बहादूर शास्त्री भाजीपाला मार्केट आणि शंकर मार्केट या चार संकुलांचे पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या मनपाच्या स्थायी समितीत निविदा दर मंजुर करीत मे. बोरसे ब्रदर्स इंजि. आणि कॉन्ट्रॅक्टर्स पीव्हीटी एलटीडी यांची अंदाजपत्रकीय दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधी मार्केट मधील गाळेधारक, भाजीपाला तसेच कापड आणि इतर व्यापार्‍यांना आपआपले गाळे खाली करण्यासाठी तसेच मार्केट पुढील रस्त्यावरील विक्रेत्यांच्या गाड्या, हॉकर्स यांना हटवण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी आज एक बैठक मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. या बैठकीला पाचकंदील चौकातील गाळेधारक तसेच विक्रेते उपस्थित होते. या बैठकीत त्यांना पर्यायी जागेवर स्थलांतरीत होण्याच्या तसेच नवीन मार्केट मध्ये गाळा मिळवण्यासाठी आवश्यक हमीपत्र देण्यासाठी थकबाकी भरण्याच्या सुचना करण्यात आल्या.

याविषयी माहिती देतांना आयुक्त कापडणीस यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने पाचकंदील मार्केटचे पुनर्विकासाला सुरुवात केली जात आहे. येत्या १५ दिवसात कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी येथील गाळेधारकांना आज सुचना देण्यात आल्या आहेत. या विक्रेत्यांना पाचकंदील मार्केटचे काम पुर्ण होत नाही, तोपर्यंत शाळा क्रमांक ४ आणि ५ तसेच जेलरोडसह क्युमाईन क्लब जवळील जागेवर पर्यायी जागा देण्यात येणार असून तेथे आतापासुनच आपली दुकाने हलवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

६० ते ७० टक्के गाळेधारकांनी मनपाची भाडे आणि इतर करांची थकबाकी भरली आहे त्यांना हमीपत्र देण्यात आले आहेत. ज्यांनी थकबाकी भरलेली नाही त्यांनी ती भरावी जेणेकरुन त्यांना हमीपत्र दिले जाईल. तसेच बांधकामाला अडथळा येवू नये, तसेच कोणता अपघात होवू नये, यासाठी सुध्दा समोर विक्रेत्यांना गाड्या लावण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत केले. वर्षभरात नवीन मार्केट बांधून तयार करण्यात येईल असेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news