

धुळे : शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारात वन जमिनीवर तयार करण्यात आलेली गांजाची शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या संयुक्त पथकाने उध्वस्त केली आहे. या कारवाईत सुमारे दोन कोटी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात रुपसिंगपाडा येथे वनजमीनीवर कैलास भावसिंग पावरा याने मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा गांजा या अंमलीपदार्थाची व्यापारी प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी अवैधरित्या लागवड केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश केले. त्यानुसार यावरुन स्थानीक गुन्हे शाखा व शिरपुर तालुका पोलीस ठाणे अशा दोन टिम तयार करण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी छापा कारवाई केली असता कैलास भावसिंग पावरा हा कसत असलेल्या वनजमीनीवर गांजाची अवैधरित्या लागवड केलेली आढळली. सदर ठिकाणावरुन 2 कोटी 20 लाख रुपये किंमतीचा 11 हजार किलो वजनाचा गांजा वनस्पतीची हिरवी, ओली, ताजी झाडे असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची कारवाई होण्याची चाहूल लागल्यामुळे वनजमीन कसत असलेला पावरा हा घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. याबाबत पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिरपुर तालुका पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मनोज कचरे हे करीत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुढी शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोसई सुनिल वसावे, प्रकाश पाटील, मनोज कचरे, मिलींद पवार, असई कैलास जाधव, पोहेकॉ पवन गवळी, अनिल चौधरी, आरीफ पठाण, मनोज नेरकर, चेतन बोरसे, कमलेश सुर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, सतिष पवार, सागर कासार यांनी केली आहे.