धुळे : जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळांडूनी विविध खेळ प्रकारात प्राविण्य मिळवून आपल्या जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे धुळे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेले व प्राविण्य प्राप्त खेळांडूचा सन्मान कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. प्रारंभी, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करुन राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शिक्षणाधिकारी मनिष पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, जिल्हा क्रीडा महासंघाचे डॉ.महेश घुगरी, शारिरीक शिक्षण शिक्षक संघटनाचे डी.बी.सांळुखे, युवा शारिरीक शिक्षण शिक्षक संघटना संदीप शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते निरज चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले व प्राविण्य प्राप्त खेळाडू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, खेळ हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून त्याला वयाचे बंधन नसते. सर्वांनी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा खेळ निवडून खेळले पाहिजेत. विशेषत: विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळात योगदान दिले पाहिजे. सध्याचे युग हे खेळाडूंचे युग असून पूर्वीच्या काळात खेळाडूंना फारश्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नव्हत्या. आता मात्र खेळ आणि खेळांडूना खूप महत्व प्राप्त झाले असून त्यांना शासनामार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे खेळांडूनी खेळामध्ये यशस्वी होवून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील काही खेळांडूची ऑलिंपिक मध्ये संधी हुकली होती. त्यांनी निराश न होता प्रयत्न करावे भविष्यात त्यांना नक्कीच यश मिळेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. धुळ्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आतरंराष्ट्रीय खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी टिळे म्हणाले की, केंद्र शासनाच्यावतीने दरवर्षी स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मेजर ध्यानचंद यांनी भारतातील क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक आपल्या तांत्रिक कौशल्य विकासाने वाढविल्याने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दरवषी जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करून क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे व जिल्हा क्रीडा परिषद, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रथम प्रोत्साहनात्मक अनुदान प्राप्त कनोसा कॉन्व्हेंट स्कूल, हस्ती पब्लीक स्कूल, श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय व न्यू कॉलेज, मोहाडी उपनगर, चावरा पब्लिक स्कूल, एस.एस. व्ही. एस. कॉलेज या शाळांना अनुदान देण्यात येवून मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती प्राप्त 20 खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येवून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर धुळे जिल्हयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सन 2023-2024 या वर्षांतील शासनाने मान्यता दिलेल्या शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने राज्यातील एकविध खेळ संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेले एकूण 64 खेळाडूंंचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. क्रीडा अधिकारी एम. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा अधिकारी रेखा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी गौरव परदेशी, योगेश देवरे, स्वप्नील बोंडे, क्रीडा मार्गर्शक योगेश पाटील, मदन गावीत, मृदा अग्रवाल, योगेश्वरी मिस्तरी, श्वेता दिनेश शिरसाठ, राहुल देवरे आदि उपस्थित होते.