

धुळे : देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, योगदान दिले अशा जवानांचे व त्यांच्या कुटुंबियाचे प्रलंबित प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नेहमीच प्राधान्य राहील. अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील बहुउद्देशिय हॉल येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन-2024 निधी संकलन प्रसंगी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सर्वानंद डी, एसआरपीएफचे समादेशक प्रभाकर शिंदे, सा. बां. विभागाचे उप अभियंता धर्मेन्द्र झाल्टे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील (निवृत्त), सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियाच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेनादलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल. शहीद कुटुंबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक शहीद कुटूंबिय, शहीद जवानाच्या घरावर नावाच्या पाट्या लावण्याचा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्यातील सर्व विभागांनी अतिशय चांगले काम करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मागील वर्षांप्रमाणे यावर्षीही 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, खाजगी आस्थापना, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक धिवरे म्हणाले की, देशात शहीदांचे योगदान महत्वपूर्ण असे आहे. शहीद झाल्यानंतर कुटूंबास अनेक अडचणी येतात. अशा सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने जाणीव ठेवून सर्वांनी मनात एक संकल्प करुन ध्वजदिन निधी संकलनात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. पाटील यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनामागील भूमिका विषद करुन जिल्ह्याला गेल्या वर्षी 61 लाख 40 हजार रुपये निधी संकलनाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याने 68 लाख 68 हजार इतका निधी संकलीत केला. असे त्यांनी सांगितले. यावेळी वीरमाता इंदुबाई सुर्यवंशी, वीरपत्नी शोभा पाटील, सुरेखा कचवे, अरुणा राऊत, भारती सुर्यवंशी, माया पाटील, रुपाली गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. मनोज पाटील यांनी सुत्रसंचलन केले. संजय तावरे यांनी आभार मानले.